सकारात्मक पालकत्व
जबाबदार पालक बना....
सकारात्मक पालकत्व आज अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत जबाबदारीने त्याला देशाचा भावी आधारस्तंभ, चांगला नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रत्येक बालकाला दर्जेदार शिक्षण मिळावे सहा ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना सक्तीचा व मोफत शिक्षणाचा अधिकार महाराष्ट्र शासनाने आरटीइ ऍक्ट 2009 नुसार दिलेला आहे. एकंदरीत या गोष्टीचा विचार करता बालक हा शिक्षण प्रणालीच्या केंद्रस्थानी आहे. बालकांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आमचा विद्यार्थी हा वैश्विक दृष्टिकोनातून विचार केला तर एक सक्षम विद्यार्थी, सुसंस्कार संपन्न नागरीक घडविण्याचा दृष्टिकोनातून प्रत्येक शिक्षक व पालकांची भूमिका असणे अत्यंत आवश्यक असते. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्यातील सर्व गुण ,कला, कौशल्य यांच्या विकासासाठी प्रत्येक पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या पाल्याच्या दैनंदिन जीवनामध्ये विकास करण्यासाठी प्रत्येक पालकांची भूमिका ही दीपस्तंभ सारखी ठरत असते. कारण शिक्षण व सुसंस्कार ही प्रक्रिया कधीही न संपणारी प्रक्रिया असते. नवीन शिक्षण धोरणानुसार प्रत्येक बालकांमध्ये संवेदनशील वृत्ती, परोपकार ,राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, सामाजिक मूल्य, जीवन कौशल्यांचा विकास या गोष्टींचा विकास करण्यासाठी शिक्षक व पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक असते . मुलांच्या मनात देशाविषयी देशप्रेम, देशभक्ती ,राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे. सानेगुरुजींनी सांगितलेली भूतदया, परोपकार, करुणा यांचे बिजारोपण, सुसंस्कारसंपन्न विचार आपण प्रत्येक बालकांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असते. सानेगुरुजी त्यामुळेच म्हणायचे की खरा तो एकची धर्म lजगाला प्रेम अर्पावे l सानेगुरुजींच्या प्रार्थनेतील भाव प्रत्येक मुलांमध्ये निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक पालकांनी काही जाणीवपूर्वक आपली कर्तव्य पार पाडणे गरजेचे वाटते.
*प्रत्येक पालकाचे कर्तव्य*
1. प्रत्येक पालकाला वाटते मुलाने मोबाईल पाहू नये परंतु स्वतः मात्र मोबाईल पाहतात. या गोष्टीत प्रत्येक पालकांनी बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. आज आधुनिकीकरण वेगाने वाढत आहे. आधुनिकीकरण प्रगती बरोबर सुख सुविधा ,साधने भौतिकसुविधा यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत आहे. प्रत्येकाच्या गरजांचे स्वरूप बदलत आहे.या युगामध्ये प्रत्येक पालकासमोरील सर्वात अत्यंत महत्त्वाची समस्या म्हणजे आपली मुले अत्यंतिक मोबाईल पाहत आहेत मोबाईलच्या आहारी गेलेली मुले पालकांना पहावयास मिळत आहेत. मुलांचा अधिकाधिक वेळ स्क्रीनवर जात असल्यामुळे त्यांच्या डोळ्यांना खूप त्रास होत आहे. डोळ्यांच्या समस्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत आहे मुलांच्या डोळ्याच्या बुबुळाचा आकार कमी होत आहे. मुलांना मायोपिया नावाच्या आजाराने ग्रस्त केलेले आहे .मुलांची एकाग्रता कमी होते आहे.मुलांचा मेंदूचा विकास ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे त्याप्रमाणे मध्ये होत नाही .मुलांची वाचन संस्कृती बंद पडण्याच्या मार्गावर आहे .त्यामुळे प्रत्येक पालकाला वाटते की माझ्या मुलाने मोबाईल पाहू नये. परंतु प्रत्येक पालकाला या गोष्टीचा विसर पडला आहे की जर मला माझ्या मुलांमध्ये योग्य बदल अनुरूप बदल घडून आणायचे असतील तर त्यासाठी सर्वप्रथम मला स्वतःला मोबाईल कमी पाहणे गरजेचे आहे. प्रत्येक पालक ,माता-पिता स्वतः मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे रात्रंदिवस ते घरी ,ऑफिस , सार्वजनिक जीवन सर्वच ठिकाणी ते मोबाईल पाहत आहेत.आणि आपण स्वतः मोबाईल पाहून मुलाकडून अशी अपेक्षा ठेवत असतो की माझ्या मुलाने मोबाईल पाहुणे मोबाईलचा कमीत कमी वापर करा करणे गरजेचे आहे परंतु ही सर्वात चुकीचे आहे त्यामुळे प्रत्येक पालकांनी स्वतः अनुकरणप्रिय बनवून आपल्या मुलावर समोर एक आदर्श घालून दिला पाहिजे स्वतः कमीत कमी मोबाईल पाहणे मुलासोबत चर्चा करणे ,गप्पागोष्टी करणे ,शाळेतील झालेले प्रसंग आपल्या मुलांना विचारणे ,त्याच्या भावविश्वातील गोष्टीची एकरूप होणे गरजेचे असते .अन्यथा आपण स्वतः मोबाईल पाहून मुलाकडून ही अपेक्षा करणे अत्यंत चुकीची आहे. एका साधू महात्म्याकडे एक महिला आपल्या दहा वर्षाच्या मुलाला घेऊन आली व म्हणाली की ,"महाराज , माझा मुलगा अतिशय गोड खात आहे .याला तुम्ही उपदेश करा. महाराजांनी तिला चार दिवसांनी घेऊन यायला सांगितले .चार दिवसांनी आल्यानंतर महाराजांनी पुन्हा त्या महिलेला आठ दिवसांनी बालकाला आणायला सांगितले. आठ दिवसानंतर ती महिला मुलाला घेऊन गेली. महाराजांनी पुन्हा तिला पंधरा दिवसानंतर आणायला सांगितले. महाराजांनी पुन्हा तिला एक महिन्यानंतर बालकाला घेऊन येण्यास सांगितले. महिला त्रासून गेली की महाराज काही सांगत नाही नुसते पुन्हा पुन्हा घेऊन या. पुन्हा घेऊन या असेच सांगत आहेत आहेत . एक महिन्यानंतर महाराजांनी त्या बालकाला सांगितले की ,बाळा तू गोड खाऊ नको. जास्त प्रमाणात गोड खाणे आरोग्यासाठी अपायकारक असते .महिला निराश होऊन म्हणाली ,महाराज एवढेच सांगायचे होते तर पहिल्या दिवशी सांगायचे ना ?मला वाटले तुम्ही याच्यावर काहीतरी उपाय सांगून मार्गदर्शन उपदेश करताल .त्यावेळेस महाराजांनी सांगितले, अहो बोले तैसा चालेlत्याची वंदावी पाऊले l मी बालकाला उपदेश करण्याच्या अगोदर स्वतःच गुळ जास्त खात होतो, त्यामुळे मला सांगण्याचा नैतिक अधिकार नव्हता .ज्यावेळेस मी स्वतः एक महिन्यांमध्ये गुळ खाणे बंद केलेले आहे. त्यावेळेस मला आता या मुलाला सांगण्याचा नैतिक अधिकार आहेत .नैतिकतेचे पाठबळ ,नैतिकतेचा उपदेश खूप मोठा असतो आणि म्हणून आता मी याला सांगत आहे याप्रसंगातून आम्हाला एक गोष्ट आमच्या लक्षात येते की कोणतेही जबाबदारी पार पाडत असताना आम्हाला स्वतः अगोदर आचरण करावे लागते व त्यानुसार आम्ही केलेल्या आचरण योग्य असेल तर आम्ही ते इतरांना सांगण्यासाठी पात्र होऊ शकतो. त्यामुळे मला प्रत्येक पालकांना सांगावे वाटते की आपण स्वतः मोबाईलचा वापर कमी करणे गरजेचे आहे तरच आमचे पाहून आमची मुले मोबाईलचा वापर कमीत कमी करतील.
2. प्रत्येक पालकांना वाटते की आमच्या मुलाने आमचे ऐकावे परंतु आम्ही त्या मुलाला समजून घेत नाही. प्रत्येक पालकांचे अपेक्षा असते की आपल्या पाल्याने आपले विचार ,आपले उपदेश ऐकावे परंतु आम्ही कधीतरी स्वतः त्याच्या जागी बसून विचार केला आहे का की प्रत्येक बालकांच्या सुद्धा काही अपेक्षा असतात आम्ही त्या अपेक्षा कधीही विचारात घेत नाही त्यामुळे आम्हाला त्याच्याकडून विनाकारण अपेक्षा करणे अत्यंत गरजेचे वाटते. आम्ही प्रत्येक बालकांना समजून घेणे अपेक्षित आहे. प्रत्येक पालकांच्या इच्छा, आकांक्षा ,अपेक्षा, स्वप्ने यांना आम्ही समजून घेणे गरजेचे आहे. मुलांमध्ये जर आपल्याला त्याच्या कला, गुण, कौशल्यांचा विकास करायचा असेल तर त्याची विचार त्याच्या कल्पना यांचा देखील आम्ही विचार करणे अत्यंत आवश्यक असते .संत रामदास स्वामी म्हणतात की शुद्ध बीजापोटी lफळे रसाळ गोमटी ll जर आमचे आचरण योग्य असेल आम्ही जर मुलाला समजून घेत असू तर आमची मुले देखील आमच्या मार्गानुसार आमच्या उपदेशानुसार त्यांच्या जीवनातील आचरण करत असतात. आजची मुले ही भारताचे सक्षम नागरिक नागरिक आहेत .त्यासोबत समाज विकासाचे आधारस्तंभ आहेत. मुले ही कृतीतून शिकत असतात .त्यामुळे प्रत्येक पालकांनी मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी पूरक वातावरण निर्मिती करून दिले पाहिजे .त्याच्या शिक्षणास प्रोत्साहन दिले पाहिजे त्याच्याकडून अनेक कृती करून घेतल्या पाहिजेत आणि मुलांना समजून घेणे अत्यंत गरजेचे असते.
3. आम्हाला वाटते मुलांनी पुस्तके वाचावी परंतु आम्ही मात्र कधीही पुस्तक वाचत नाहीत. प्रत्येक पालकांची अपेक्षा असते की आपल्या मुलाने वाचन वाढविणे गरजेचे आहे आज वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला आहे या आधुनिकीकरणाचे युगामध्ये वाचनाकडे प्रत्येक घटकाचे दुर्लक्ष होत असलेले आपणास दिसून येते परंतु आम्ही स्वतः कधीही पुस्तके वाचत नाहीत परंतु मुलाकडून मात्र आम्ही पुस्तके वाचण्याचे अपेक्षा करत असतो .यापेक्षा आम्ही जाणीवपूर्वक मुलांना पुस्तक वाचनाकडे घेऊन जाणे अत्यंत गरजेचे असते आणि काही विचारवंतांची, लेखकांची पुस्तके आपल्या बालकास उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्याच्या समोर आपण स्वतः देखील पुस्तकाचे वाचन करणे अत्यंत आवश्यक असते .ज्यावेळेस आम्ही स्वतः वाचन करत असतो त्यावेळेस आमची मुले कळत न कळत अनुकरणाच्या मार्गातून स्वतः देखील वाचनाकडे आकर्षित झालेली आपणास दिसतील .विद्यार्थ्यांमध्ये असणारे आत्मप्रेरणा जर आम्हाला जागृत करायचे असेल तर स्वतः पालकांनी आत्माप्रेरित होऊन स्वतः वाचनाकडे लक्ष देणे गरजेचे असते. वाचनातून प्रत्येक बालकाचे स्वतंत्र विचारसरणी विकसित होऊन त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत असतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः अत्यंत बुद्धिमान व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे असल्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा ,जातीभेद आणि अन्याय विरुद्ध लढा उभा केला त्.यामुळे प्रत्येक बालकांमध्ये विचारपूर्वक तर्क संगत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जाणीव निर्माण करण्यासाठी आम्हाला वाचनाची आवड लावणे अत्यंत आवश्यक आहे .
4. आम्ही स्वतः मुलांना बदलण्याचा विचार करतो परंतु स्वतः बदलत नाही. मुले ही अनुकरणप्रिय असतात. अनुकरणातून मुले शिकत असतात. त्यामुळे प्रत्येक पालकांनी अगोदर स्वतः बदलणे गरजेचे आहे. जीवन एक संघर्ष आहे संघर्ष शिवाय प्रगती नाही त्यामुळे प्रत्येक पालकांनी मुलांमध्ये मेहनत सातत्य या गुणांचे बिजारोपण करण्यासाठी स्वतः बदलण्याचा विचार करणेआवश्यक आहे. आम्ही फक्त मुलांना बदलण्याचा विचार करतो. नव्या पिढीने बदलावे या बदलांच्या अपेक्षा आमच्या असतात. परंतु त्यासाठी प्रत्येक पालकांनी स्वतः बदलणे गरजेचे आहे स्वतःचे विचार मतपरिवर्तन बदलून आपण बालकाच्या अनुरूप अनुकरणप्रिय विचारातून आदर्श मुलासमोर निर्माण करणे गरजेचे असते.प्रत्येक पालकांनी स्वतः बदलणे गरजेचे आहे
5. प्रत्येक पालकांच्या अपेक्षा आपला पाल्य शांत राहावा. परंतु स्वतः मात्र चिडचिड, ताणतणाव , ओरडणे रागावणे असे प्रकार करतात. प्रत्येक पालकांच्या अपेक्षा असते की आपल्या पाल्याने शांतपणे राहून आमच्या सर्व अपेक्षांची पूर्तता करावी परंतु घरी आलेला पालक मात्र स्वतः शांत न राहता ताणतणाव ,ओरडणे ,चिडणे, रागावणे या गोष्टी जर करत असेल तर मुलावर कोणत्या पद्धतीचे सुसंस्कार आम्ही करत आहोत. याचा प्रत्येक पालकांनी विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. आधुनिकीकरणाच्या युगामध्ये वैश्विक दृष्टिकोनातून जागतिकीकरणाचा विचार करत असताना प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यावर सुसंस्कारक्षम नागरिक घडविण्यासाठी स्वतःमध्ये स्वपरिवर्तन करूनच आम्ही एक जबाबदार पालक असणेगरजेचे आहे .आमच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य यांचा विचार आम्ही करणे आवश्यक आहे. केवळ आपल्या बालकाकडून, पाल्याकडून अपेक्षांची परिपुर्ततेसाठी आम्ही अपेक्षा न ठेवता प्रत्येक पालकांचे काय कर्तव्य आहे सकारात्मक पालकत्व कोणत्या दृष्टिकोनातून आम्ही मुलावर सुसंस्कार करत आहोत याचा विचार करत असते. म्हणून प्रत्येक पालकांनी एक जबाबदार पालक बनणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment