सकारात्मक पालकत्व आई-वडिलांची भूमिका
*आई-वडिलांची भूमिका*
यशस्वी पालकत्व या गोष्टीचा विचार करत असताना प्रत्येक पालकाने आपल्या मुलावर सुसंस्कार करण्यासाठी सकारात्मक विचारांचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे असते. मुले हे देशाचे भविष्य असतात. भारताला 21 व्या शतकामध्ये आर्थिक महासत्ता करायचे असेल तर भारताचे भविष्य हे शाळा- शाळातून, घराघरातून, परिवार- परिवारातून घडत असलेले आपणास दिसत आहे. कोठारी आयोगाने सुद्धा सांगितले भारताचे भविष्य हे क्रीडांगणावर घडत आहे. खेळाकडून मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक विकास होत असतो. मुले ही देशाचे भविष्य आहेत. मुले देशाची संपत्ती आहे. मुले ही कुटुंब ,देश, समाज, राष्ट्र या सर्वांचे कल्याण करण्यासाठी येणारी महत्त्वाची पिढी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले हे विश्वची माझे घर .हे विश्व जर आपल्याला एक घर म्हणून जर कुटुंबात, समाजात वावरायचे असेल तर येणारी ही पिढी ही सुसंस्कार संपन्न असणे अत्यंत गरजेचे आहे. आज विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे खूप मोठी प्रगती होत आहे. परंतु या प्रगतीच्या फायद्यासोबतच याचे काही तोटे, नुकसान सुद्धा आपणास पाहण्यास मिळत आहेत. वास्तविक पाहता विज्ञानाने खूप मोठ्या स्वरूपाची प्रगती केलेली आहे. पाश्चात राष्ट्रात तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे. विज्ञानाच्या ,तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवन सुसह्य झाल्याचे आपणास पहावयास मिळत आहे. परंतु एका बाजूला विचार केला तर यामुळे माणसा माणसापासून माणूस दूर जात असल्याचे आपणास पहावयात आहे. अनेक वेळेचा प्रवास एका तासावर आला तरीसुद्धा आज प्रत्येक जण म्हणतो की आम्हाला वेळ नाही. एखादा निरोप देण्यासाठी ज्याला आठ दिवस लागायचे तो निरोप एका सेकंदात मिळतो तरी आजही माणूस म्हणत आहे की मला वेळ नाही. आठ आठ दिवसावर चालणारे लग्न एका दिवसावर आले तरी माणूस म्हणतो की मला वेळ नाही. वेळ हा आहे परंतु वेळ योग्य पद्धतीने वापरणे, वेळेचे व्यवस्थापन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. मुलावर सुसंस्कार करणे मुलावर योग्य पद्धतीची जबाबदारी देणे,मुलाच्या चारित्र्याचा विकास घडवून आणणे हे प्रत्येक पालकाची कर्तव्य असते. त्यामुळे प्रत्येक पालकाने काही विशिष्ट जबाबदारी घेऊन आपल्या मुलावर योग्य पद्धतीचे संस्कार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
*पालकांचे कर्तव्य*
1) मुलावर लहानपणापासून सुसंस्कार करा. यशस्वी पालकत्व या गोष्टीचा विचार करत असताना प्रत्येक पालकाने आपल्या मुलावर लहानपणापासून सुसंस्कार करणे अत्यंत गरजेचे असते. ज्या पद्धतीचे विचार, संस्कार आपण मुलावर करू त्याच पद्धतीचा विचाराच्या संस्कारामधून त्या बालकाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. त्यामुळे बालक म्हणजे एक मातीचा ,चिखलाचा गोळा. आपण जसा त्याला आकार देऊ त्या पद्धतीने तो घडत असतो. कुंभार एखाद्या मडक्याला आकार देतो, त्या मडक्याच्या आकारातूनच त्या कुंभाराचे विचार हे मडक्यातून प्रवर्तित होत असतात. त्यामुळे आपला बालक असा असावा. आपल्या बालकावर कोणत्या पद्धतीचे संस्कार करावे हे माता पितांचे महत्वाचे कर्तव्य असते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलावर सुसंस्कार करा.कारण एकदा जर मुलांच्या चुका वाढत गेल्या तर नंतर मुलावर सुसंस्कार करता येणार नाहीत . एकदा एखादे मडके पक्के तयार झाले ते भाजले तर पुन्हा त्याची माती तयार होऊन त्यापासून दुसरे मडके घडविता येत नाही.एका साधू महाराजांकडे एक सावकार आले आणि त्यांनी सांगितले की, "महाराज ,माझा मुलगा खूप मोठ्या स्वरूपामध्ये व्यसनाच्या दिशेने वाटचाल करत आहे." जर त्याला वेळीच आळा घातला नाही. वेळीच प्रतिबंध केला नाही तर तो पुढे खूप मोठा व्यसनी व्यक्ती म्हणेल असे मला वाटत आहे. साधू महाराजांनी त्यांना सांगितले की ,"तुमच्या मुलाचे वय काय ?"त्याने सांगितले की ,"माझ्या मुलाचे वय 22 वर्षे आहे".साधूनी त्याला सांगितले की," त्याला माझ्याकडे पाठवून द्या".दुसऱ्या दिवशी साधू महाराजांकडे तो युवक जातो आणि त्यावेळेस साधु महाराज त्याला सांगतात की ,"बाबा रे, तू हे छोटे झाड उपट." त्या युवकाने एका झटक्यात एक छोटेसे झुडुप उपटून टाकले. नंतर साधू महाराजांनी त्याला थोडेसे मोठे झुडुप उपटायला सांगितले.त्याने ते झुडुप एका झटक्यात उपटले. नंतर साधू महाराजांनी त्याला मोठा वृक्ष उपटण्यास सांगितले. आता मात्र तो घामाघूम झाला .ओलाचिंब झाला. तरी त्याला ते वृक्ष उपटता येईना. त्यावेळेस आता महाराजांनी सांगितले की, 'बाबा रे व्यसनाचे सुद्धा असेच आहे. जोपर्यंत व्यसन कमी प्रमाणात आहे तोपर्यंतच व्यसनाची सवय सुटू शकते. परंतु जर त्याचा एकदा मोठा डोंगर झाला ,मोठा स्वरूपात व्यसन वाढले तर पुन्हा मात्र ती चूक दुरुस्त करता येत नाही ."युवकाच्या लक्षात आले की आपण व्यसनाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. त्याने महाराजांचे पाय पकडले. तो म्हणाला,"महाराज, आज पासून मी व्यसन करणार नाही व माझी असलेली व्यसनाची सवय मी तात्काळ सोडून देणार आहे".अगदी त्याच प्रकारे मुलावर आम्ही लहानपणापासून योग्य पद्धतीचे सुसंस्कार करणे अत्यंत गरजेचे असते. कारण आम्ही केलेले सुसंस्कार हे त्या बालकावर चिरकाल टिकत असतात.
2) मुलांना दुसऱ्याच्या चुका माफ करायला शिकवा.
क्षमा हे वीरांचे भूषण आहे. अनेक वेळेस बालकावरच सुसंस्कार करत असताना इतरांनी केलेल्या चुका आपण माफ केल्या पाहिजे. कारण एखाद्याच्या चुका जर आपण कायम आपल्या मेंदूमध्ये कायम साठवून ठेवत आलो तर त्यामुळे आपली मानसिक शांती हरवून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वतःला सुखी राहण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे दुसऱ्यांच्या चुका माफ करणे. त्यामुळे आम्ही मुलांना इतरांच्या चुका माफ करायला शिकविणे गरजेचे असते. जेव्हा आम्ही दुसऱ्याला माफ करायला शिकवितो त्यावेळेस आम्हाला एक आत्मिक आनंद मिळत असतो .त्या आत्मिक आनंदाचे अनुभूतीतून आम्ही जीवन जगत असतो. त्यामुळे मुलांना दुसऱ्यांच्या चुका माफ करायला शिकवा. कारण दुसऱ्यांच्या चुकांना माफी देण्यातूनच आपण स्वतः सुखी होऊ शकत असतो. 3)मुलांना प्रार्थना करायला शिकवा. सकारात्मक पालकत्व या गोष्टीवर विचार करत असताना ईश्वराचे आराधना करणे अत्यंत गरजेचे असते.आपण कोणत्याही जाती ,धर्म, पंथ, वंश, यांना मानत असू द्या. परंतु प्रत्येक धर्माचे जातीचे पंथाचे एक आराध्य दैवत असते. आपण जर त्याच्यावर आढळ श्रद्धा निष्ठा ठेवून जर त्याची उपासना केली तर नक्कीच आपणास संकटातून योग्य मार्ग सापडत असतो. वास्तविक पाहता संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक व्यक्तीस स्वतःच प्रयत्न करावा लागत असतो. परंतु ते प्रयत्न करण्यासाठी जे नैतिक अध्यात्मिक पाठबळ पाहिजे ते ईश्वराची आराधना केल्याच्या नंतरच मिळत असते. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना प्रार्थना करायला शिकविणेअत्यंत गरजेचे असते.
4)मुलांना स्वतःच्या चुका स्वीकारण्यास सांगा. जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या चुकांचा स्वीकार करणे. ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःच्या चुकांचा स्वीकार करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमच्या मनामध्ये परिवर्तनाच्या दिशेने आम्ही वाटचाल करत असतो. वर्तनात ईस्ट परिवर्तन घडविते तेच खरे शिक्षण. परंतु ईस्ट परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्हाला आमच्या स्वतःच्या चुका स्वीकारणे आवश्यक असते.
5)पालकांचे वर्तन आदर्श असावे.
सकारात्मक पालकत्व या गोष्टीवर विचार करत असताना प्रत्येक पालकांची भूमिका अशी असते की मी कसेही असो. माझे वर्तन कसेही असो .परंतु माझा मुलगा मात्र राजा हरिश्चंद्र सारखा, प्रभू श्रीरामचंद्र यांच्यासारखा आचरण करणारा पाहिजे. वास्तविक पाहता पालकांचे वर्तन हेच मुलांमध्ये परावर्तित होत असते. कारण मुले हे आपल्या पालकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वर्तन करत असतात. पालकांचे वर्तन म्हणजे मुलासाठी आरसा असतो.
त्यासाठी मुलावर चांगले संस्कार करणेअत्यंत गरजेचे असते. त्यासाठी पालकांचे वर्तन आदर्श असणे गरजेचे असते. पालकाचे वर्तन प्रामाणिक असावे .एखादा व्यापारी असेल तर त्याने व्यापाराच्या माध्यमातून व प्रामाणिकपणा जपावा.असे म्हटले जाते की बेईमानीने मिळविलेल्या यशापेक्षा इमानदारीने आलेले अपयश चांगले असते. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या स्वतःच्या वर्तनातून मुलासमोर आदर्श ठेवणे गरजेचे असते .अनेक पालक स्वतः व्यसन करतात, स्वतः तंबाखू खातात, परंतु मुलाकडून अपेक्षा ठेवतात की,माझ्या मुलाने व्यसन करून नये,तंबाखू खाऊ नये. परंतु तुमच्याकडे पाहूनच मुलगा शिकत असतो. प्रत्येक पालक बालकाचा रोल मॉडेल असतो. म्हणजे प्रत्येक मुलाचा आदर्श म्हणजे त्याचा बाप असतो आणि जर मुलाचा बाप चुका करत असेल ,आमच्या बापाचे वर्तनाचा आदर्श नसेल आमच्या बापाच्या हातून प्रामाणिकपणा नसेल तर मुलावर योग्य संस्कार केले जाणार नाहीत.
प्रत्येक आई-वडिलांनी मुलावर चांगले सुसंस्कार करणे गरजेचे असते. आमच्या स्वतःच्या वागण्यातून आचरणातून विचारातून मुले घडत असतात .त्यामुळे आमचे आचरण ,आमचे विचार हे आदर्श घेण्यासारखे असणे अत्यंत गरजेचे असते.
Comments
Post a Comment