आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
*आनंदी जीवनाची गुरुकिल्ली*
जीवन सुंदर आहे. जगणं सुंदर आहे .परंतु प्रत्येकाला आपले जीवन, आपलं जगणं हे आनंददायी करता आले पाहिजे. कारण जीवनामध्ये आनंद हा आपल्या मानण्यावर आहे .जर आपले मन समाधानी असेल ,आपले अंतःकरण समाधानी असेल तर आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे. 1) आंतरिक परिवर्तन ,हृदय परिवर्तन करा. संत कबीर म्हणतात की मन लोभी मन लालची मन चंचल मन चोर lमन के मत मत चलिये, पलक पलक मन और llआनंद हा आपल्या मनावर अवलंबून असतो असे म्हटले जाते की, आमच्या 40% आनंदाचा हिस्सा आमच्या मनावर अवलंबून असतो. आम्ही काय विचार करतो आमचे वर्तन कसे असते आम्ही कोणत्या क्रिया करतो यावर आमच्या जीवनातील 40% आनंदाचे प्रसंग अवलंबून असतात .50% आनंद हा आमच्या अनुवंशिक कारणामुळे आम्ही आनंदी राहू शकतो. केवळ दहा टक्के आमचा आनंद हा परिस्थितीवर अवलंबून असतो की आम्ही येणाऱ्या परिस्थितीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो. आमचा मेंदू त्याला कोणत्या प्रकारचे प्रतिक्रिया देतो यावर दहा टक्के आनंद अवलंबून असतो. म्हणून आमचा आनंद हा आमच्या सकारात्मक विचारावरच अवलंबून असतो असे म्हटले जाते . आमचा आनंद हा आमच्या परिस्थितीवर अवलंबून असल्यामुळे त्यासोबतच आमचे विचार ,आमचा आहार ,आमचे शारीरिक क्रिया ,आमचा दिनक्रम यावर आनंद अवलंबून असतो. एखाद्या प्रसंगांमध्ये जर आम्ही विनाकारण ताणतणाव,चिंता, इर्षा, आळस या गोष्टी विचारात घेतल्या तर आम्हाला आनंद मिळणार नाही. जर आम्ही आनंदी राहिलो तर आमचे हृदय क्रियाशील राहते. त्यामुळे आमच्या जीवनातील एक चतुर्थांश हृदयाचे आजार कमी होतात असे म्हटले जाते .त्यासोबतच आमच्या शरीरातील हार्मोन कार्टेसोल यांचा स्तर कमी केला जातो. प्रतिजैविक आमच्या शरीरामध्ये चांगली तयार होतात. आमचा आहार चांगला असेल आणि आमच्या मनामध्ये शारीरिक सक्रियता असेल आम्हाला झोप चांगली लागते आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही नेहमी आनंदी राहावे असे अपेक्षित आहे .आनंदाचे सगळ्यात महत्त्वाचे लक्षण आहे हास्य जे लोक अधिक हसतात ते व्यक्ती अधिक आकर्षक दिसतात आणि म्हणून हसणारे व्यक्ती हे आत्मविश्वासी लोकांना आवडणारे अशा प्रवृत्तीचे असतात की जे इतर सोबत आंतरक्रिया करून व्यवहारिक संबंध ,नाते चांगले जुळले जाते. विश्वविख्यात लेखक स्टीफन कोही असे म्हणतात की जोपर्यंत माणूस हृदयापासून परिवर्तित होणार नाही तोपर्यंत त्याचे बाह्य परिवर्तन निरोपयोगी असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने अंतरंगातून स्वतःमध्ये बदल घडवून आणणे स्वतःचे विचारधारा ,दृष्टिकोन बदलणे, विचार प्रवृत्ती बदलणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण आंतरिक शक्ती ही आमच्या आंतरिक परिवर्तनातूनच निर्माण होत असते आणि म्हणून आम्हाला आमच्या विचारांमध्ये परिवर्तन आणणे गरजेचे आहे. 1) *सकारात्मक दृष्टिकोन बाळगा* आमचे विचार सकारात्मक असतील तर आम्ही जीवनामध्ये आनंदी राहू शकतो .नोबल पुरस्कार विजेते कवी टी एस इलियट म्हणतात कीआमच्याकडे असलेल्या भौतिक सुख सुविधा व्यवहार वातावरण आमचा पोशाख यातील परिवर्तन हे केवळ आम्हाला गती देऊ शकतात .परंतु स्थिरता देऊ शकत नाहीत म्हणून बाह्य परिवर्तन यातून आनंद निर्माण न होता आमच्या आंतरिक परिवर्तनातूनच आनंद निर्माण होत असतो .कबीरजी म्हणतात की बाबी कुटे बावरा सर्प न मारिया जाईl मूर्ख बांबी न डसे सर्प सबनको खाईll कबीरजी सांगतात की सापाच्या बिळावर भलेही वरून हजारो लाठांचे प्रहार झाले तरी आतल्या सापाला काहीही धोका पोहोचणार नाही. तसे जर तुम्हाला सापाला मारायचे असेल तर केवळ बाहेरचे प्रयास नको तर आम्हाला त्या सापाच्या बिळामध्ये लाठ्या काठ्यांचा प्रहार करावा लागेल तद्वतच केवळ बाह्य दृष्टिकोनातून आम्हाला आनंद मिळणार नाही जोपर्यंत आमच्या मनामध्ये आंतरिक समर्पण ,आंतरिक भावभावना आमचे शुद्ध असणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद मिळणार नाही .जेव्हा आम्ही आमचे सुख केवळ सुख सुविधा यामध्ये शोधत असतो तोपर्यंत आम्हाला खरे सुख मिळणार नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात की सुख पाहता जवा पडे lदुःख पर्वता एवढेll आमच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण काही थोडेच असतात .असं म्हटलं जातं की मानवी जीवन म्हणजे सुखदुःखाच्या धाग्याने विणलेला रुमाल आहे .जीवनामध्ये येणारे सुखाचे क्षण थोडेच असतात परंतु ते सुखाचे क्षण आम्हाला ओळखता आले पाहिजेत. मिळणाऱ्या क्षणांमध्ये आम्हाला आंतरिक ऊर्जेतून आनंद मानता आला पाहिजे .जोपर्यंत आम्ही असा आनंद मानणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आमचे सुख आम्हाला प्राप्त होणार नाही *2)तुलना करू नका*. संत रामदास स्वामी म्हणतात की ,जगी सर्व सुखी असा कोण आहे lविचारी मनात तुझी शोधूनी पाहे llजगामध्ये सर्व सुखी असा कोणीही नाही. प्रत्येक जण कुठल्या ना कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी दुःखी आहे म्हणून आपल्याजवळ जे आहे त्यात आपण समाधान मानणे गरजेचे आहे .आज माणूस दुःखी आहे ,निराश आहे, कष्टी आहे ,माझ्याकडे ज्या वस्तू नाहीत त्यामुळे नाही तर दुसऱ्याकडे असलेल्या भौतिक सुखसुविधा पाहून आज प्रत्येकाला दुःख वाटत आहे .त्यामुळे दुसऱ्यांच्या सुख सुविधांचा बहुतेक सुविधांचा विचार न करता आपल्याकडे जे वस्तू आहेत प्राप्त परिस्थितीमध्ये आपण आनंद मानणे आज आवश्यक झालेले आहे .कारण इतरांशी तुलना न करता कारण दुसऱ्याकडे काय आहे याच्या पेक्षा माझ्याकडे काय आहे याच्यामध्ये मी समाधान मानले तर मी सुखी आहे ही भावभावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करणे आज गरजेचे आहे
हाच आनंदाचा सुखाचा गुरुमंत्र आहे असे म्हटले जाते म्हणून इतरांची तुलना करू नका कारण तुलनेच्या खेळामध्ये आपल्या हाती काहीही लागणार नाही *3) चांगले संस्कार जोपासा*.. आमचे सुसंस्कार जर चांगले असतील तर आमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपले संस्कार चांगले जोपासणे आपले चारित्र्य चांगले ठेवणे आवश्यक आहे. आज समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी घडत आहेत या सर्व चुकीच्या संस्कारातून घडलेल्या कृतीमधून हे निर्माण होत आहे म्हणून सुसंस्कार चांगले करणे गरजेचे आहे .ज्याच्यावर चांगले सुसंस्कार असतात तो मिळणाऱ्या प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी जीवन जगत असतो. आज नशा वाईट आहे मग हा नशा पदाचा ,पैशाचा ,धनाचा, परिश्रमाचा किंवा तंबाखू ड्रग्स दारू यांचा असू शकतो. यापासून दुराचाराची निर्मिती होत असते. त्यामुळे विचाराविना आचार हा पांगळा असतो तर आचारावीना विचार हा लंगडा असतो आणि म्हणून आचार आणि विचार यांची सुसंगत सांगड असणेआज आवश्यक आहे. म्हटले जाते की *सुसंगती सदा घडो lसुजन वाक्य कानी पडो ll*"आमची संगती कशा पद्धतीची आहे यावर आमचा आनंद अवलंबून असतो. आमची संगत चांगली असेल तर आमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे. परंतु जर आम्ही दुराचारी व्यक्तीची संगत केली तर आमच्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच आहे. एकदा एका राजहंसाने कावळ्याची संगत केली आणि हा कावळा एका दही विकायला जाणाऱ्या व्यक्तीच्या मडक्यावर बसला आणि दही पिऊ लागला .राजहंसाला एक गंमत वाटली आणि कावळ्याने त्यालाही दही पिण्यासाठी बोलावले .कावळा आणि राजहंस दही पिऊ लागले. दुष्ट कावळ्याच्या संगतीला राजहंस लागला व राजहंसाला दुष्टाची संगती चांगली वाटू लागली. परंतु दुष्टाच्या संगतीचा शेवट हा वाईट असतो हे राजहंस विसरला .दुष्टाच्या संगतीमध्येच खरा जीवनाचा आनंद आहे असे राजहंस याला वाटू लागले होते. परंतु ते चुकीचे होते. थोड्या वेळामध्ये त्या व्यक्तीला आपल्या माठावर कोणीतरी पक्षी बसून दही पीत आहे हे त्याच्या लक्षात आले .त्याने डोक्यावर हात वर घेतल्याबरोबर कावळा भुरकन उडून गेला राजहंस मात्र सापडला गेला आणि त्या व्यक्तीने त्या राजहंसाला जखमी करून टाकले .म्हणजेच दुष्ट कावळ्याची संगत राजाहंसाने केली आणि त्या संगतीमुळे त्याच्या जीवनातला आनंद नाहीसा झाला व त्याला दुःखाचा सामना करावा लागला .त्यामुळे आपली संगत अत्यंत महत्त्वाची असते .अशा पद्धतीने सुख हे जीवनामध्ये मिळत असते परंतु सुखाचे क्षण आपल्याला ओळखता आले पाहिजेत सुखाच्या क्षणाचे मोती हे वेचताआले पाहिजेत. संगती कशी असते याचे सुंदर उदाहरण पहा पाण्याचा थेंब तोच असतो, तव्यावर पडला तर करपून जातो, चिखलात पडला तर गढूळ होतो, समुद्रात पडला तर खारट होतो परंतु शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो. आमच्या जीवनाचे सार्थक करायचे असेल आमच्या जीवनामध्ये आम्हाला आनंदी आनंद मानायचा असेल तर आम्हाला आमची संगत अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून साधुसंत ,महापुरुष यांच्या विचारधारेनुसार आमचे आचरण करणे आवश्यक असते तरच आमच्या जीवनामध्ये साफल्य सफलता यशप्राप्ती कार्यसिद्धी होते असे म्हटले जाते.
Comments
Post a Comment